गुरुवार, ८ डिसेंबर, २०११

समशेर -सुरांची प्रीती (बाजीराव-मस्तानी)

तिचा तिलाही प्रश्न पडे की कशाकशावर मोहुन गेले
स्वप्न गुलाबी पाहत असता अलगद सारे गुंतुन गेले

डोक्यावरती भगवा मंदिल, त्यावर रुळती मोतीमाळा
भव्य कपाळी शिवगंधासह भाग्य देखणे हसून गेले

काजळकाळी कमान वेडी धरते डोळ्यावरती छाया
बाक तयाचा असा पाहुनी इंद्रधनुही लाजुन गेले

शौर्य झळाळे रणांगणी पण पापणपंखी हळवी थरथर
ती उठता मग हो नाही चे अनवट कोडे सुटून गेले

शामदान ही लाजुन जावे अन शमेने खाली झुकावे
"तु माझी ग" डोळ्यातून ते तेज वाहते सांगून गेले

अनुजा (स्वप्नजा) 

क्रमशः

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

समशेर -सुरांची प्रीती (बाजीराव-मस्तानी)

कशी थांबली मोहिनी श्वास रोखुनी क्षणभरी
भिडली नयनपाकळी लाज सोडूनी क्षणभरी

हाच तो हाच तो गरजली तिची मनोदेवता
प्राण ज्यासी अर्पावा साक्ष पटूनी क्षणभरी

गोल घेउनी रिंगण ती आली त्यासामोरी
हासला तो अन चमकली सौदामिनी क्षणभरी

भास झाला कृष्णं आला सोडूनी गोकुळा
गेली ती ही स्वखुशी राधा बनुनी क्षणभरी


गात होती सूर वेडे घालुनी स्वर मोहिनी
दिसले तिला ग देखणे सुराहूनी क्षणभरी

चीज ताना बांधताना बांधला संग रेशमी
सांगते कथा आगळी ऐका थांबुनी क्षणभरी

अनुजा (स्वप्नजा) 

क्रमशः