गुरुवार, ८ डिसेंबर, २०११

समशेर -सुरांची प्रीती (बाजीराव-मस्तानी)

तिचा तिलाही प्रश्न पडे की कशाकशावर मोहुन गेले
स्वप्न गुलाबी पाहत असता अलगद सारे गुंतुन गेले

डोक्यावरती भगवा मंदिल, त्यावर रुळती मोतीमाळा
भव्य कपाळी शिवगंधासह भाग्य देखणे हसून गेले

काजळकाळी कमान वेडी धरते डोळ्यावरती छाया
बाक तयाचा असा पाहुनी इंद्रधनुही लाजुन गेले

शौर्य झळाळे रणांगणी पण पापणपंखी हळवी थरथर
ती उठता मग हो नाही चे अनवट कोडे सुटून गेले

शामदान ही लाजुन जावे अन शमेने खाली झुकावे
"तु माझी ग" डोळ्यातून ते तेज वाहते सांगून गेले

अनुजा (स्वप्नजा) 

क्रमशः

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

समशेर -सुरांची प्रीती (बाजीराव-मस्तानी)

कशी थांबली मोहिनी श्वास रोखुनी क्षणभरी
भिडली नयनपाकळी लाज सोडूनी क्षणभरी

हाच तो हाच तो गरजली तिची मनोदेवता
प्राण ज्यासी अर्पावा साक्ष पटूनी क्षणभरी

गोल घेउनी रिंगण ती आली त्यासामोरी
हासला तो अन चमकली सौदामिनी क्षणभरी

भास झाला कृष्णं आला सोडूनी गोकुळा
गेली ती ही स्वखुशी राधा बनुनी क्षणभरी


गात होती सूर वेडे घालुनी स्वर मोहिनी
दिसले तिला ग देखणे सुराहूनी क्षणभरी

चीज ताना बांधताना बांधला संग रेशमी
सांगते कथा आगळी ऐका थांबुनी क्षणभरी

अनुजा (स्वप्नजा) 

क्रमशः

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

नात

नात्यातली दरी जी दोघांना इतक लांब करते की ऐलतीरावरच पैलतीरावर ऐकूही येत नाही, नात तुटत तेव्हा तो तुटलेला धागा एखाद्या नको असलेल्या अवयव सारखा आयुष्यभर वागवावा लागतो ...समोरून नकार येण ही गोष्ट विसरली जाऊही शकते पण जुळून आलेल नात ज्याने एकेकाळी वसंत अनुभवला आहे त्या नात्याचं नाकारलं जाणं, ही गोष्ट आयुष्यभर धमन्यातून रक्ता सारखी फिरत राहते ...बाहेर पडून जमाना होतो त्याला पण जखमेनंतरच्या व्रणासारखी त्वचेलगत तीच अस्तित्व असतच ......आणि विस्मरणाच वरदान या असल्या नाकारलेल्या आणि इगोवर घाव झालेल्या नात्यांच्या बाबतीत कधीही काम करत नाही त्यांना आठवणीचा शाप असतो ...त्या ही अणुकुचीदार आठवणी ज्यांच्यात व्रणामधूनही जखम हिरवी करण्याची ताकद असते ....असे अनेक अश्वथामा असल्या आणि असल्या कित्येक जखमा घेऊन अवती भवती वावरत असतील याची कल्पनाच ना केलेली बरी .....त्यातले काही आयुष्य संपवतात आणि नव्या जखमांसाठी नव शरीर धारण करतात कदाचित....पण माझा तर आत्महत्येवर विश्वास नाही कारण जिथे मन आत्मा सगळ वाहूनही ज्यात दुरावा येतो तो निव्वळ ती ती व्यक्ती ते नात सांभाळायला आणि निभावायला मानसिक रित्या कमकुवत असते म्हणून किंवा सगळ्या परीघ पलीकडे जाऊन ते प्रेम स्वीकारायला त्या व्यक्तीचा ठाम पणा कमी पाडतो म्हणून तिथेच मनाने प्राण सोडलेला असतो आणि ज्या शरीरात मनच नसते त्याला वेगळ्या आत्महत्येची काय गरज ????

अनुजा

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

पुन्हा नव्याने

पुन्हा नव्याने डाव मांडणे नकोच आता 
पुन्हा नव्याने जुने सांधणे नकोच आता 

जमले नाही दो रंगांचे मिसळून जाणे 
पुन्हा नव्याने रंग रंगणे नकोच आता 

काटे कसले फूलच रुतले खोल आतवर 
पुन्हा नव्याने वेल फुलवणे नकोच आता

गोड गुलाबी कोडे कधीच सुटले नाही 
पुन्हा नव्याने तेच उखाणे नकोच आता 

चुकले नाही हुकले हातुन क्षण दोघांच्या 
पुन्हा नव्याने बहरुन रुसणे नकोच आता

तळव्यामागे झाकुन डोळे वाट चालली
पुन्हा नव्याने स्वप्न पाहणे नकोच आता

तुटून पडल्या आठवणींचे ओझे वाहू 
पुन्हा नव्याने तेच गुंतणे नकोच आता 

वसंत फिरुनी येतच असतो सुकल्या तरुवर 
पुन्हा नव्याने वठून जाणे नकोच आता 

अंतर व्हावे दूर म्हणोनी किती धावलो 
पुन्हा नव्याने मृगजळ जगणे नकोच आता 

राहून गेले मनामनाचे कागद कोरे 
पुन्हा नव्याने शब्द सजवणे नकोच आता 

नशा भैरवी चढली आता ह्या डोळ्यावर
पुन्हा नव्याने ते मैखाने नकोच आता

काळ लोटला मिठीत तुझिया मिटले होते 
पुन्हा नव्याने जगून मरणे नकोच आता 

राखेतुन जरी जन्म घेतला पुन्हा नव्याने 
पुन्हा नव्याने राखच होणे नकोच आता


अनुजा (स्वप्नजा)

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

मीरा म्हणे....

मीरा हसुनी सांगे राधेला
रोजच भेटे श्रीहरी मजला
हेवा मी करू तरी कसला
तो माझ्यातच भरुनी उरला

सकाळी माझ्या शेजेवरी
सूर्यकिरण बनुनी येतो
अल्लड उधळीत उषा
लाडिक चाळा तो करितो

स्नानासाठी मी जाता
माझ्यास्तव तो जल होतो
मी माळंता फुले सुगंधी
तोच तयातुनी परीमळतो

गंध उगळता त्याच्यासाठी
चंदन बनुनी तो झिजतो
माला गुंफता जाईची
तो सूत्र म्हणुनी वावरतो

मी नेसता वस्त्र रेशमी
तो तयातील मार्दव बनतो
मी करिता शृंगार दर्पणी
तो सौंदर्य माझे होतो

मी छेडीता वीणा विरागी
तो तारांचे अंतर बनतो
पायी बांधता मी घुंगरू
नादमधुर तो झंकारून उठतो

रात्री माझ्या गवाक्षातुनी
चंद्र बनुनी पाझरतो
नक्षत्रांचे घेवूनी लेणे
तो नीजभूल बनुनी येतो

माझ्या नयनी निद्रा येता
तो स्वप्नांचे अस्तर बनतो
स्वप्नातुनही मग तो मजला
रूप तयाचेच दाखवतो

प्याला विषाचा ओठी लाविता
जहर तयातील तो बनतो
मृत्यूची पवित्र वाट चालता
तो मोक्षदाता बनतो

माझ्या मधले पंचप्राण तो
हृदयीचा हर एक श्वास तो
मी नाही मीरा नुसती
माझ्यातील चैतन्य रूप तो

मी म्हणजेच कृष्णं असे
त्याच्यातूनही माझे रूप दिसे
तो घेता राधे मिठीत तुजला
मीच मिठीतील मिठास असे

अनुजा(स्वप्नजा)

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

आसवे

पापण्यांना भार झाली आसवे 
वेदनेच्या पार झाली आसवे 


चालताना वाट स्वप्नांची अशी
मोगर्याचा वार झाली आसवे 


श्वास झाला पारिजाताचा तुझा 
कोवळा गंधार झाली आसवे 


छेडता तू प्रणय रागा रे सख्या 
देखणा श्रुंगार झाली आसवे 


वेढ्ले तू चांदणी स्पर्शी असे 
तृप्तिचा हुन्कार झाली आसवे 


वाट्ते रेशीम आहे या करी
मखमली झंकार झाली आसवे 


संपला हा टोचणारा जोगिया 
हाय ही गुलजार झाली आसवे 




अनुजा(स्वप्नजा) 

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

लिही गझल तू

शर्वरशाईस कुंतालातूनी टिपून घे अन लिही गझल तू 
भांगाच्या वळणावळणातूनी मिसरे घे अन लिही गझल तू 

लल्लाटीच्या कुमकुमकोरीत उमले कसा बघ धुन्द चांदवा 
मक्त्यास्तव घे भुवईची लाडिक चढण अन लिही गझल तू 

बावरवेडे गहिरे गहिरे तुझा आईना काजळडोळे 
पापणीतली स्वप्नअलामत वेचून घे अन लिही गझल तू 

अप-याश्या नाकातून चमके अल्लडचमकी चांदण जैशी 
श्वास बहरता शब्दांमधूनी भरून घे अन लिही गझल तू 

ओठांची ती मलमल भाषा जरा स्पर्शता काहूर उठता 
निवड त्यातुनी तलम काफिये गुंफुन घे अन लिही गझल तू 

कानाच्या नाजूक पाळीवर उठवून जातो रक्त लालिमा 
त्या दंतव्रणाच्या हव्या वेदना जगून घे अन लिही गझल तू 

सरकून जातो भास दामिनी नितळ मानपन्हाळीमधुनी 
सरसर उठत्या रोमांचातून रदीफ घे अन लिही गझल तु 

कातिव कोरिव हर कोनातुन घाट तनाचा मोहक मोहक
हात बांधुनी कटी सभोती वृत्त बांध अन लिही गझल तू 


कशास तुझला हवेत कागद , हवी लेखणी उगीच लिहिण्या 
अधरकुंचला शुभ्रशरीरी फिरवून घे अन लिही गझल तू 

अनुजा (स्वप्नजा)