शनिवार, ७ मे, २०११

एकटीच

एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी
तु आला अचानक बदलवून गेलास जन्मांतरी

का तु दाखवले मला काट्यातही फुलती फुले
वेदनाही माझी का अशी जी तुझ्यापाशीच खुले
ग्रीष्मवेदना वेचताना का दाविल्या श्रावण सरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

आसवे ही सुख आणती अन सुखानेही येते रडे
तुझ्या स्पर्शी कवितेलाही प्राजक्ती स्वप्न पडे
अश्रुनाही का तु दिले कोंदण सुखाचे भरजरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

झोपलेल्या स्वप्नंफुलांना जाग आणली नवी
वठून गेल्या फांदिलाही हुंकारली कोवळी पालवी
का राखेतुनी घडवली पुन्हा मूर्त ही कारीगरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

जायचेच होते तुला तर का आणले श्वास तु
भंगल्या तनुतही का छेडीले गांधार तु
स्वप्नंभंगातूनही माझ्या अजून हिंडोल हुंकारी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

मृत्युच्या नेक खांद्यावरी फुलणार आता बागेसरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी





अनुजा(स्वप्नजा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा