सोमवार, ९ मे, २०११

दे मंत्र पुन्हा जो दिला समर्थे तुझला


  रायगडावर जाण्याचा योग नुकताच आला पहिल्यांदा तीन तास वाट आणि नुसतेच सह्याद्रीचे सुळके पाहण्यात वेळ गेला पण नंतर अक्षराशः सार्थक झाल्यासारख वाटल. आधी पुणेकर असल्याने साहजिकच सिंहगड हाच जीव कि प्राण होता त्याची भव्यता खूप!!! पण आता हा किल्ला पहिला  आणि राजधानीचा खरा अर्थ कळला. तो इतका भव्य दरवाजा कि तो पाहताच आतल्या वैभवाची साक्ष पटावी. तसं पाहिलं तर मला विशेष अप्रूप नव्हत  वाटायचं कि त्यात काय! महाराजांबद्दल खूप अभिमान होताच पण तरीही पाऊल तसं मागेच होत. वाटायचं कि जणू ते दिवस पुन्हा तर येणार नाहीत कशाला त्यात गुंता? पण  रायगड पहिला आणि खरोखर पुन्हा इतिहासाच्या प्रेमात पडावसं वाटल मनापासून! तिथल्या मातीतून हर हर महादेव ची गाज आजही येते असा भास खरोखर होत होता. पवलागाणीक वाटायचं इथे शिवरायांचा स्पर्श झाला असेल इथे ते बसले असतील इथून कितीतरी मोहिमा पार पडल्या असतील सगळ कस अगदी भाराल्यासारख  झालेलं!
     तिथली बाजारपेठ पाहून तर तुळशी बाग डोळ्यासमोर तरळली, तो भव्य नगारखान  जिथून विजयाच्या शेकडो नौबती झडल्या असतील आणि तो राजप्रसाद जिथे महाराज सिहासनावर बसाले असतील ….. आणखी काय काय वाटत होत,  मनाशी विचार केला आपण एवढे emotional कधी झालो बर? मग कळल वातावरणाचा परिणाम होतोच कितीही अलिप्त राहायचं ठरवलं तरी एक झुळूक अशी येते कि तिच्या सुगंधाने आपल मन आपल्याला त्यात गुंतायला भाग पाडतं वाहवत नेत स्वतःसोबत आणि मी अशीच त्या शिवशाहीत अक्षराशः न्हाहून गेले. मग एक नवीन खेळ सुरु झाला प्रत्येक ठिकाणी ती व्यक्ती तो प्रसंग खरा घडतोय असा वाटू लागल आपण त्यातला एक अव्यक्त भाग आहोत हि जाणीव होऊ लागली. मन अभिमान, आनंद अश्या संमिश्र भावनांनी भरून आलं. कवी भूषण  आपल काव्य गाताहेत असं वाटू लागल.
      समाधीस्थळ आलं  आणि महाराज गेल्यावर जो कल्लोळ त्या लोकांच्या मनात  उठला असेल ती भावना मानत खोलवर दाटून  आली आणि लगेच वर्तमानात माझी पावलं आपोआप आली प्रकर्षाने वाटल पुन्हा तेच घडायला हव आहे का? परत सावरकरांनी म्हणल्या प्रमाणे ” दे मंत्र पुन्हा जो दिला समर्थे तुजला” असा घडायला हवय मंत्रमुग्ध  व्हायची वेळ आली आहे……फक्त मराठीपणाचे पोवाडे गावून काय होणारेय?  एवढी मोठी  राजधानी बांधणारा हिरोजी इंदुलकर आज आहे? जो इनाम मागतो तर काय एक क्षुल्लक शिलालेख ज्या वरूनही त्याची निष्ठाच ओसंडून वाहते ” सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ” ! आज सगळीकडे मंत्रीपदसाठी सख्यांचा जीव घेणारेच सपडतात.. महाराज त्यांच्या कार्याने आपल्यासाठी वाट आखून गेलेयेत पण त्यावर साध चालण्याच धैर्य किती जणात आहे? फुगत चाललेले पगार आणि परदेशवार्या यातून मध्यम वर्गाला वेळ नाही, मोठ्यांची दुखणीही मोठी आणि गरिबांना रोजच्या संघर्षातून वेळ आहे? आपल्या महाराष्ट्राला वाली आहे? आपला महाराष्ट्र आणि पर्यायाने आपण खरोखर पोरके झालो आहोत? मागची अभिमानाची जाणीव कापरा सारखी उडून गेली, कसला अभिमान? माझ्या इतक्या २२ -२३  वर्षाच्या आयुष्यात मी काय केलं अस लोकविलक्षण? का मला त्यांच्या गड कोटांचा अभिमान वाटावा? माझ त्यात काय योगदान आहे?  मला फक्त जॉब्स अकॅडमिक इतक्यापुरातच रक्तच पाणी केलेलं आठवतं आता माझी खरच लायकी नाहीये त्यांच्या वैभवावर अभिमान धरण्याची……… मला अतिशय  एकट आणि अगतिक वाटू लागल तिथली चिमुटभर माती कपाळाला लावली आणि अस्ताला जाणार्या सूर्य सकट मी हि खूप एकाकी होऊन आणि असंख्य प्रश्न घेवून परतीच्या वाटेला  लागले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा