सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

पुन्हा नव्याने

पुन्हा नव्याने डाव मांडणे नकोच आता 
पुन्हा नव्याने जुने सांधणे नकोच आता 

जमले नाही दो रंगांचे मिसळून जाणे 
पुन्हा नव्याने रंग रंगणे नकोच आता 

काटे कसले फूलच रुतले खोल आतवर 
पुन्हा नव्याने वेल फुलवणे नकोच आता

गोड गुलाबी कोडे कधीच सुटले नाही 
पुन्हा नव्याने तेच उखाणे नकोच आता 

चुकले नाही हुकले हातुन क्षण दोघांच्या 
पुन्हा नव्याने बहरुन रुसणे नकोच आता

तळव्यामागे झाकुन डोळे वाट चालली
पुन्हा नव्याने स्वप्न पाहणे नकोच आता

तुटून पडल्या आठवणींचे ओझे वाहू 
पुन्हा नव्याने तेच गुंतणे नकोच आता 

वसंत फिरुनी येतच असतो सुकल्या तरुवर 
पुन्हा नव्याने वठून जाणे नकोच आता 

अंतर व्हावे दूर म्हणोनी किती धावलो 
पुन्हा नव्याने मृगजळ जगणे नकोच आता 

राहून गेले मनामनाचे कागद कोरे 
पुन्हा नव्याने शब्द सजवणे नकोच आता 

नशा भैरवी चढली आता ह्या डोळ्यावर
पुन्हा नव्याने ते मैखाने नकोच आता

काळ लोटला मिठीत तुझिया मिटले होते 
पुन्हा नव्याने जगून मरणे नकोच आता 

राखेतुन जरी जन्म घेतला पुन्हा नव्याने 
पुन्हा नव्याने राखच होणे नकोच आता


अनुजा (स्वप्नजा)

1 टिप्पणी:

  1. राखेतुन जरी जन्म घेतला पुन्हा नव्याने
    पुन्हा नव्याने राखच होणे नकोच आता


    अप्रतिम.... सुंदर..

    उत्तर द्याहटवा