सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

लिही गझल तू

शर्वरशाईस कुंतालातूनी टिपून घे अन लिही गझल तू 
भांगाच्या वळणावळणातूनी मिसरे घे अन लिही गझल तू 

लल्लाटीच्या कुमकुमकोरीत उमले कसा बघ धुन्द चांदवा 
मक्त्यास्तव घे भुवईची लाडिक चढण अन लिही गझल तू 

बावरवेडे गहिरे गहिरे तुझा आईना काजळडोळे 
पापणीतली स्वप्नअलामत वेचून घे अन लिही गझल तू 

अप-याश्या नाकातून चमके अल्लडचमकी चांदण जैशी 
श्वास बहरता शब्दांमधूनी भरून घे अन लिही गझल तू 

ओठांची ती मलमल भाषा जरा स्पर्शता काहूर उठता 
निवड त्यातुनी तलम काफिये गुंफुन घे अन लिही गझल तू 

कानाच्या नाजूक पाळीवर उठवून जातो रक्त लालिमा 
त्या दंतव्रणाच्या हव्या वेदना जगून घे अन लिही गझल तू 

सरकून जातो भास दामिनी नितळ मानपन्हाळीमधुनी 
सरसर उठत्या रोमांचातून रदीफ घे अन लिही गझल तु 

कातिव कोरिव हर कोनातुन घाट तनाचा मोहक मोहक
हात बांधुनी कटी सभोती वृत्त बांध अन लिही गझल तू 


कशास तुझला हवेत कागद , हवी लेखणी उगीच लिहिण्या 
अधरकुंचला शुभ्रशरीरी फिरवून घे अन लिही गझल तू 

अनुजा (स्वप्नजा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा