गुरुवार, ८ डिसेंबर, २०११

समशेर -सुरांची प्रीती (बाजीराव-मस्तानी)

तिचा तिलाही प्रश्न पडे की कशाकशावर मोहुन गेले
स्वप्न गुलाबी पाहत असता अलगद सारे गुंतुन गेले

डोक्यावरती भगवा मंदिल, त्यावर रुळती मोतीमाळा
भव्य कपाळी शिवगंधासह भाग्य देखणे हसून गेले

काजळकाळी कमान वेडी धरते डोळ्यावरती छाया
बाक तयाचा असा पाहुनी इंद्रधनुही लाजुन गेले

शौर्य झळाळे रणांगणी पण पापणपंखी हळवी थरथर
ती उठता मग हो नाही चे अनवट कोडे सुटून गेले

शामदान ही लाजुन जावे अन शमेने खाली झुकावे
"तु माझी ग" डोळ्यातून ते तेज वाहते सांगून गेले

अनुजा (स्वप्नजा) 

क्रमशः

मंगळवार, ६ डिसेंबर, २०११

समशेर -सुरांची प्रीती (बाजीराव-मस्तानी)

कशी थांबली मोहिनी श्वास रोखुनी क्षणभरी
भिडली नयनपाकळी लाज सोडूनी क्षणभरी

हाच तो हाच तो गरजली तिची मनोदेवता
प्राण ज्यासी अर्पावा साक्ष पटूनी क्षणभरी

गोल घेउनी रिंगण ती आली त्यासामोरी
हासला तो अन चमकली सौदामिनी क्षणभरी

भास झाला कृष्णं आला सोडूनी गोकुळा
गेली ती ही स्वखुशी राधा बनुनी क्षणभरी


गात होती सूर वेडे घालुनी स्वर मोहिनी
दिसले तिला ग देखणे सुराहूनी क्षणभरी

चीज ताना बांधताना बांधला संग रेशमी
सांगते कथा आगळी ऐका थांबुनी क्षणभरी

अनुजा (स्वप्नजा) 

क्रमशः

शुक्रवार, २५ नोव्हेंबर, २०११

नात

नात्यातली दरी जी दोघांना इतक लांब करते की ऐलतीरावरच पैलतीरावर ऐकूही येत नाही, नात तुटत तेव्हा तो तुटलेला धागा एखाद्या नको असलेल्या अवयव सारखा आयुष्यभर वागवावा लागतो ...समोरून नकार येण ही गोष्ट विसरली जाऊही शकते पण जुळून आलेल नात ज्याने एकेकाळी वसंत अनुभवला आहे त्या नात्याचं नाकारलं जाणं, ही गोष्ट आयुष्यभर धमन्यातून रक्ता सारखी फिरत राहते ...बाहेर पडून जमाना होतो त्याला पण जखमेनंतरच्या व्रणासारखी त्वचेलगत तीच अस्तित्व असतच ......आणि विस्मरणाच वरदान या असल्या नाकारलेल्या आणि इगोवर घाव झालेल्या नात्यांच्या बाबतीत कधीही काम करत नाही त्यांना आठवणीचा शाप असतो ...त्या ही अणुकुचीदार आठवणी ज्यांच्यात व्रणामधूनही जखम हिरवी करण्याची ताकद असते ....असे अनेक अश्वथामा असल्या आणि असल्या कित्येक जखमा घेऊन अवती भवती वावरत असतील याची कल्पनाच ना केलेली बरी .....त्यातले काही आयुष्य संपवतात आणि नव्या जखमांसाठी नव शरीर धारण करतात कदाचित....पण माझा तर आत्महत्येवर विश्वास नाही कारण जिथे मन आत्मा सगळ वाहूनही ज्यात दुरावा येतो तो निव्वळ ती ती व्यक्ती ते नात सांभाळायला आणि निभावायला मानसिक रित्या कमकुवत असते म्हणून किंवा सगळ्या परीघ पलीकडे जाऊन ते प्रेम स्वीकारायला त्या व्यक्तीचा ठाम पणा कमी पाडतो म्हणून तिथेच मनाने प्राण सोडलेला असतो आणि ज्या शरीरात मनच नसते त्याला वेगळ्या आत्महत्येची काय गरज ????

अनुजा

सोमवार, १४ नोव्हेंबर, २०११

पुन्हा नव्याने

पुन्हा नव्याने डाव मांडणे नकोच आता 
पुन्हा नव्याने जुने सांधणे नकोच आता 

जमले नाही दो रंगांचे मिसळून जाणे 
पुन्हा नव्याने रंग रंगणे नकोच आता 

काटे कसले फूलच रुतले खोल आतवर 
पुन्हा नव्याने वेल फुलवणे नकोच आता

गोड गुलाबी कोडे कधीच सुटले नाही 
पुन्हा नव्याने तेच उखाणे नकोच आता 

चुकले नाही हुकले हातुन क्षण दोघांच्या 
पुन्हा नव्याने बहरुन रुसणे नकोच आता

तळव्यामागे झाकुन डोळे वाट चालली
पुन्हा नव्याने स्वप्न पाहणे नकोच आता

तुटून पडल्या आठवणींचे ओझे वाहू 
पुन्हा नव्याने तेच गुंतणे नकोच आता 

वसंत फिरुनी येतच असतो सुकल्या तरुवर 
पुन्हा नव्याने वठून जाणे नकोच आता 

अंतर व्हावे दूर म्हणोनी किती धावलो 
पुन्हा नव्याने मृगजळ जगणे नकोच आता 

राहून गेले मनामनाचे कागद कोरे 
पुन्हा नव्याने शब्द सजवणे नकोच आता 

नशा भैरवी चढली आता ह्या डोळ्यावर
पुन्हा नव्याने ते मैखाने नकोच आता

काळ लोटला मिठीत तुझिया मिटले होते 
पुन्हा नव्याने जगून मरणे नकोच आता 

राखेतुन जरी जन्म घेतला पुन्हा नव्याने 
पुन्हा नव्याने राखच होणे नकोच आता


अनुजा (स्वप्नजा)

शुक्रवार, ११ नोव्हेंबर, २०११

मीरा म्हणे....

मीरा हसुनी सांगे राधेला
रोजच भेटे श्रीहरी मजला
हेवा मी करू तरी कसला
तो माझ्यातच भरुनी उरला

सकाळी माझ्या शेजेवरी
सूर्यकिरण बनुनी येतो
अल्लड उधळीत उषा
लाडिक चाळा तो करितो

स्नानासाठी मी जाता
माझ्यास्तव तो जल होतो
मी माळंता फुले सुगंधी
तोच तयातुनी परीमळतो

गंध उगळता त्याच्यासाठी
चंदन बनुनी तो झिजतो
माला गुंफता जाईची
तो सूत्र म्हणुनी वावरतो

मी नेसता वस्त्र रेशमी
तो तयातील मार्दव बनतो
मी करिता शृंगार दर्पणी
तो सौंदर्य माझे होतो

मी छेडीता वीणा विरागी
तो तारांचे अंतर बनतो
पायी बांधता मी घुंगरू
नादमधुर तो झंकारून उठतो

रात्री माझ्या गवाक्षातुनी
चंद्र बनुनी पाझरतो
नक्षत्रांचे घेवूनी लेणे
तो नीजभूल बनुनी येतो

माझ्या नयनी निद्रा येता
तो स्वप्नांचे अस्तर बनतो
स्वप्नातुनही मग तो मजला
रूप तयाचेच दाखवतो

प्याला विषाचा ओठी लाविता
जहर तयातील तो बनतो
मृत्यूची पवित्र वाट चालता
तो मोक्षदाता बनतो

माझ्या मधले पंचप्राण तो
हृदयीचा हर एक श्वास तो
मी नाही मीरा नुसती
माझ्यातील चैतन्य रूप तो

मी म्हणजेच कृष्णं असे
त्याच्यातूनही माझे रूप दिसे
तो घेता राधे मिठीत तुजला
मीच मिठीतील मिठास असे

अनुजा(स्वप्नजा)

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

आसवे

पापण्यांना भार झाली आसवे 
वेदनेच्या पार झाली आसवे 


चालताना वाट स्वप्नांची अशी
मोगर्याचा वार झाली आसवे 


श्वास झाला पारिजाताचा तुझा 
कोवळा गंधार झाली आसवे 


छेडता तू प्रणय रागा रे सख्या 
देखणा श्रुंगार झाली आसवे 


वेढ्ले तू चांदणी स्पर्शी असे 
तृप्तिचा हुन्कार झाली आसवे 


वाट्ते रेशीम आहे या करी
मखमली झंकार झाली आसवे 


संपला हा टोचणारा जोगिया 
हाय ही गुलजार झाली आसवे 




अनुजा(स्वप्नजा) 

सोमवार, ७ नोव्हेंबर, २०११

लिही गझल तू

शर्वरशाईस कुंतालातूनी टिपून घे अन लिही गझल तू 
भांगाच्या वळणावळणातूनी मिसरे घे अन लिही गझल तू 

लल्लाटीच्या कुमकुमकोरीत उमले कसा बघ धुन्द चांदवा 
मक्त्यास्तव घे भुवईची लाडिक चढण अन लिही गझल तू 

बावरवेडे गहिरे गहिरे तुझा आईना काजळडोळे 
पापणीतली स्वप्नअलामत वेचून घे अन लिही गझल तू 

अप-याश्या नाकातून चमके अल्लडचमकी चांदण जैशी 
श्वास बहरता शब्दांमधूनी भरून घे अन लिही गझल तू 

ओठांची ती मलमल भाषा जरा स्पर्शता काहूर उठता 
निवड त्यातुनी तलम काफिये गुंफुन घे अन लिही गझल तू 

कानाच्या नाजूक पाळीवर उठवून जातो रक्त लालिमा 
त्या दंतव्रणाच्या हव्या वेदना जगून घे अन लिही गझल तू 

सरकून जातो भास दामिनी नितळ मानपन्हाळीमधुनी 
सरसर उठत्या रोमांचातून रदीफ घे अन लिही गझल तु 

कातिव कोरिव हर कोनातुन घाट तनाचा मोहक मोहक
हात बांधुनी कटी सभोती वृत्त बांध अन लिही गझल तू 


कशास तुझला हवेत कागद , हवी लेखणी उगीच लिहिण्या 
अधरकुंचला शुभ्रशरीरी फिरवून घे अन लिही गझल तू 

अनुजा (स्वप्नजा)

सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

एक कळी


एक कळी फुल झाली आणि हसून झाडाला म्हणली 

बाबा निघाले मी , माझ्या घरी 

झाड गदगदले  आणि बोलले 
एवढे ऋतू कधी सरले .....
आत्ता परवा तर उन्ह ओटीवर यायचं 
तेव्हा पानांचं दुपट पांघरून 
लपेटून घ्यायचो 
फुल होतानाही तिला 
माझी कळीच ग  तु म्हणायचो 

वाटायचं सोसतील का हिला 
हिवाळे पावसाळे 
सुगंधाने भरून न  जाता पशु होणारे 
मेघ कभिन्न काळे 



माणूस थांबून राहतो निसर्ग नाही 
तळहातावर जपलेल्या कळीला 
उमलण्याची घाई 
जा बाई सुखी राहा 
माझ्या पानाचा आसरा 
मनी जपून राहा 

अनुजा रमेश मुळे 

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

प्रिय बाबाला

माझे सगळे हट्ट खुप लाडाने पुरवण्यार्या माझ्या बाबाला,

आज कन्या दिवस , बाबा तू आठवणीनी मला विश केलस .....हसुन छान गिफ़्ट दिलस आणि तसाच उभा राहिलास भाबड्या डोळ्यांनी माझ्या स्वप्नाळू डोळ्याचा वेध घेत, विचारलं मी न "राहुन काय झालं???????"
खोल हसलास म्हणलास पिल्लु मोठं झालं, रीटर्न गिफ़्ट देण्याइतपत मोठं...मला गम्मत वाटली अजुनही शिश्पेन्सिल पासुन गाडी पर्यन्त माझे हट्ट आनंदाने पुरवणारा बाबा माझ्याकडे कहितरी मागतोय ......काय हवं तुला बोल....आज मी बाबा आणि तू माझ पिल्लु ....

पुन्हा हसला, उन्हाच्या तीरीपेसारखा....म्हणला अनु अग वस्तु नकोय ग काही. तुझा, तुझा वेळ देशिल थोडासा????? खळकन आत तुटलं काहितरी आणि डोळ्यानी फ़ितुरि केली दोघांच्याही .....

मला आठवला तो बाबा, मला गणपतीच्या दिवसात तासंतास गल्लीबोळातून गणपती दाखवत फ़िरवणारा.....त्या गर्दीत एखाद्याने गणपतीची मुर्ती जपावी तसा मला जपणारा.....दर शनिवारी मी शाळेत जायला हट्ट करणार आणि आइ चिडणार त्यावेळी मी शाळेत जाव म्हणुन मला दर शनिवारी नव पेन घेउन देणारा......शाळा सुटली आणी कोलेजच्या फ़ुलपंखी दिवासात मी आले ....तेव्हाही माझ्या प्रत्येक गोष्टीच कौतुक करणारा ....नवनवीन नखरे पाहुन डोळे वटारण्यार्या आई ला माझ्यासाठी प्रसन्गी लाच देणारा माझा बाबा....माझ नाटक पाहता याव म्हणून सुट्टी साठी बोस शी तंड्णारा बाबा...मला जरा जरी खरचटल तर "अला मन्तर कोला मन्तर ची जादु करणारा बाबा अश्या एक न अनेक आठवणी.....
कधीही कुठल्या गोष्टीत मला नेहमी पुढे जा सांगणारा बाबा.....ओरडण त्याला माहित नव्हत असा माझा बेस्ट फ़्रेन्ड....

पण अताशा बदलल होत सगळ गणपती पाहण्यातली मजा कधीच ओसरुन गेली होती, पेन वगरेशी तर संबध तुटला होता .....ख्ररचट्ण च काय मोठ्या जखमा ही होत होत्या आणि या नेहमीच्या रहाटगाडग्याने मला पुरतं वेढल होत ......मला नोकरीत रजा न मिळाल्याने अनेक क्षण माझ्याशिवाय गेले होते त्यांचे....माझ्या आयुश्यातल्या लहानातल्या लहान प्रसंगात माझ्या कौतुकाला किन्वा अपयश आल तर मला सावरयला माझे आइ बाबा होते .....पण त्यांचे बरचेसे प्रसंग आनंदाचे क्षण माझ्या हातातून निसटून गेले होते.....

अचानक आतुन मला आणि बाबाला जाणवल कधी हे सगळे दिवस सरले???? रेतीसारखे क्षण ख्ररच निसटून जातात ....
पण मी ठरवल आहे जितक्या समरसून त्यानी माझ्या आयुश्यात रस घेतला मी ही घेणारेय ....

या वेळी बाबा ला रीटर्न गीफ़्ट नक्की देणारेय............

अनुजा रमेश मुळे

शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

लेक लाडकी

२५ सप्टेंबर रविवार ..............

हा रविवार सगळ्यांसाठी असणारेय खास ......
ज्यांच्या लेकी लहान आहेत त्यांचा वर्तमान सांगणार्या 
ज्यांच्या मोठ्या झाल्या  आहेत, आपल्या घरी गेल्या आहेत, त्यांच्या गोजिरवाण्या आठवणी जगवणाऱ्या ......
आणि होऊ घातलेल्या आई  बाबांना सुखद भविष्याची स्वप्ने दाखवणारा ....
हसता हसता तिच्या आठवणीनी डोळ्यात पाणी आणणारा 
एक खूप खास रविवार .......

आपल्या बाहुलीला सजवा शब्दालंकारांनी आणि सामील व्हा 
मराठी कविता समूहाच्या 
"लेक लाडकी " उपक्रमात ..................

२५ सप्टेंबर २०११ पासून सकाळी ........

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०११

अंधार हा गहीरा



माळून काजव्यांना आल्या निजून राती
अंधार हा गहीरा गेल्या करून राती

जेव्हा विझून जाती येथील शामदाने
तेथे उजाडते अन येती सजून राती

ते लाजणे जरासे स्वप्नांत गुंग होणे
कौमार्य कोवळॆ हे गेल्या लुटून राती

ती सांधते अजूनी लज्जा विखुरलेली
हे रोजचेच आहे गेल्या हसून राती

गर्भात रोवलेले ते भोग वासनांचे
पेलीत जीर्ण नाती गेल्या थकून राती

रेखाटली ललाटी रेषा म्हणॆ तयाने
देवास ही इथे त्या गेल्या विकून राती

शृंगार नित्य चाले बाजार भावनांचा
पाहून नग्नता ही जाती थिजून राती

येयील का कधी तो श्रीकृष्ण उद्धराया
पाहून वाट त्याची गेल्या सरून राती

अनुजा(स्वप्नजा)

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

प्रार्थना

मराठी कविता समूहाचा चा सर्वांग सुंदर  उपक्रम लिहा प्रसंगावर गीत त्यासाठी लिहिलेली प्रार्थना 


प्रसंग :- "आसावरी प्रधान" व्यवसायाने सी. ए. 
संगीतावर निस्सीम प्रेम आणि शास्त्रीय संगीत शिकायची पोटतिडीक लहानपणापासूनच असते. आपला अभ्यास व नंतरचं व्यावसायिक शिक्षण सांभाळून अनेक वर्षं ती पं. शुभदा पराडकर ह्यांच्याकडे शिकतेय. त्यांची पट्टशिष्या बनली आहे. ताईंना (शुभदा पराडकर) त्यान्ह्या कार्यक्रमात नेहमीच तानपु-यावर साथ करते.. आणि तिचे स्वत:चेही एक गायिका म्हणून आता बरेच नावही झाले आहे. काही मोठ्या कंपन्यांची आर्थिक व गुंतवणूक सल्लागार असलेली आसावरी स्वत:ची सी.ए. फर्मसुद्धा ताकदीने चालवते. पण लहान वयातच महिन्याला लाखो रुपये कमावत असतानाही तिला मन:शांती नाही, आपल्या कामातून पूर्ण समाधान नाही. संगीतातच आपलं करीयर घडवायचं आहे आणि तसा प्रवास व तालीमही चालूच आहे. पण तरी काही तरी कमी पडतंय.
अश्यातच तिची भेट तिच्या लहानपणीच्या एका मित्राशी होते... "सागर".
सागर "मानसोपचारतज्ञ" आहे. तो मतिमंद मुलांसाठी एक विशेष केंद्र चालवतोय. ज्याचं नाव आहे "क्षितीज". सागरसोबत आसावरी सहज म्हणून "क्षितीज"मध्ये जाते. ती निरागस मुलं पाहून, त्यांच्या प्रगतीसाठी झटून मेहनत घेणारे शिक्षक पाहून, स्वत: मानसोपचारतज्ञ असूनही ह्या कार्यासाठी आपला वेळ आणि पैसा कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता खर्च करणा-या सागरला पाहून आसावरीला जाणवतं की ह्या, अश्याच कामात खरं समाधान आहे.
ती संध्याकाळी ताईंना ही गोष्ट सांगते आणि ताई तिला त्या मुलांसाठी संगीतोपचारतज्ञ म्हणून काम करायची कल्पना सुचवतात.

.
प्रसंग -
.
आसावरी खूष होते. तिला तिच्या आयुष्यात ती शोधत असलेलं "समाधान" बहुतेक मिळालं आहे, हा आनंद वाटतोय. ती "क्षितीज' मध्ये जाऊ लागते. त्या मुलांना एक प्रार्थना शिकवते.
ही प्रार्थना निर्माते-दिग्दर्शकांना लिहून हवी आहे.





निर्मियले तु जे जे काही सगळे आहे उद्दात सुंदर
अपूर्णातही फुंकलेस तू प्राणाचे हे बीज शुभंकर ||धृ||

हुंकारातून तुझिया फुलले बागबगीचे तरुलता या
जीवन त्यांचे अल्प दिसाचे हसती तरीही आनंदे या
त्या सुमनांचा परम वारसा आपण सारे येथ जपूया
गंध ना जरी रंग ना जरी बनून राहू ओला दहिवर ||१||

तूच कोरले आभाळाचे निळे शिल्प हे कातीव कोमल
तूच घडवले अवनीला या सहनशील अन मलयज शीतल
त्या दोघांचे नाते सांगत फुलतो इथला जीवन परिमल
त्या नात्याची जरा पुसटशी आहोत आम्ही हळवी थरथर ||२||


पंखां मधले बळ हे दुबळे तरी अंतरी असीम शक्ती
ऐकून आहोत मनी मानसी तुझाच चेतन वावर असती
अंधाराच्या या रस्त्यावर लावून जाऊ दीपज्योती
वाट आंधळी चालत असता हाथ तुझा दे आणिक सावर ||३||

विश्व तुझे हे रंगमंच अन रंगवीशी तू असंख्य रचना
काही असती सुंदर रेखीव, अपूर्णतेचा ध्यास काहीना
मायेने त्या निर्मळ कलिका घेशी तूची कुशीत त्याना
तूच येतशी आणि फुलविशी "क्षितीजी" ऐसे सुंदर मंदीर ||४||

अनुजा (स्वप्नजा )









सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

तुझ्यावरी मी जे उधळले होते शब्द सोने
आज बाजारी मांडले मी तेच गोड गाणे

निलाम होत जातील जेव्हा शब्दश्वास माझे
स्मरतील तू फुंकलेस त्यात जीवभास सारे
थरकतील तेच तोलता चांदीच्या हाताने
शब्दात तुझे साठलेत रेशीम धुन्दवारे

धमन्यातून तुझिया गीत रक्त म्हणूनी फिरले
आज ते प्राणगाणे मी वस्तू करून विकले
चेहर्यात तव चंद्राच्या मी भाकरी शोधिली
मग शब्दस्मशानी त्या बांधुनिया घरटे इवले

ह्या वर्तुळात कष्टाच्या त्रिज्येस हरवून बसलो
परिघातून निसटली कविता एकटाच उरलो
ऊब तुझ्या निखार्याची परक्यास धुगी देयील
राखेसही त्याच्या आता मी मोताद बनलो

तुझ्यावरी मी जे उधळले होते शब्द सोने
आज बाजारी मांडले मी तेच गोड गाणे





मूळ रचना : फ़नकार
रचनाकार : साहिर लुधियानवी

स्वैर भावानुवाद :अनुजा (स्वप्नजा)



फ़नकार

मैंने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे
आज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ...

आज दुकान पे नीलाम उठेगा उनका,
तूने जिन गीतों पर रख्खी थी मोहब्बत की असास...
आज चांदी की तराज़ू में तुलेगी हर चीज़,
मेरे अफ़कार, मेरी शायरी, मेरा एहसास...

जो तेरी ज़ात से मनसूब थे, उन गीतों को
मुफ़्लिसी, जिन्स बनाने पर उतर आई है...
भूक, तेरे रूख-ए-रंगीं के फ़सानों के इवज़
चंद आशीया-ए-ज़रूरत की तमन्नाई है...

देख इस अरसागह-ए-मेहनत-ओ-सरमाया में
मेरे नग़्में भी मेरे साथ नहीं रह सकते...
तेरे जल्वे किसी ज़रदार की मीरास सही,
तेरे खाके भी मेरे पास नहीं रह सकते...

आज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ
मैंने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे...

- साहिर लुधियान्वी




रविवार, १८ सप्टेंबर, २०११

मौन नशा

उत्कटतेच्या असीम सीमेवरी मज थांबवू नको असा
पहा विसरली हा आवर्ण्याला रातराणीही सुगंध पसा

रक्तलालिमा पूर्व दिशेचा उजळूनही कसा फिक्कटसा
अडकुन पडला जराजरासा तुझ्या मिठीने चंद्र जसा

कुंतलकाळ्या रजनीडोही विरघळला हा पहाट्वारा
अनवट वळणावरी दवाचा मोहून ओला थिजे पसारा

सतार तारा पापणीत या फिरतो अचपळ फुंकर पारा
नको थांबवू छेडीत जा तू स्पर्श सरीच्या मधुर धारा

उषेस सार्या मिठीत घेते काजळ रेषा फिसकटलेली
नकोच घाई सावरण्याची हळू निनादे स्वप्न पाकळी

अजून ही ओलस लालस आहे ओठांची ही अमृतलेणी
थांब रे अजूनही साद घालते हृदयांची स्पंदन गाणी

सैल न झाली मुग्धगंध प्राजक्त कळी बघ फांदीवरची
कशी निसटली मग ओठातली केशरकाडी अधरांची

लीपिभाषेची तोडून सीमा आज उमगली नवीन भाषा
कळले वारुणीहुनी गहरी असते डोळ्यांची मौन नशा


अनुजा (स्वप्नजा)

शनिवार, १७ सप्टेंबर, २०११

राजसा



झोप माझ्या राजसा रे रात्र झाली फार आता
सैल झाली ही मिठी अन संपला मल्हार आता

मोगर्याच्या पाकळीला पेंग आली मारव्याची
सांड्ला प्राजक्त सांगे तृप्त रे गंधार आता

रक्तिमा प्राशून माझ्या गीत ओठी गुंफ़ले तू
मौन गाणे हे तुझे रे होतसे साकार आता

तापलेली तार झंकारून आली या तनूची
तू कसा छेडीत जासी भैरवी श्रुंगार आता


शांभवीपेक्षा नशीली चाखली आता नशा मी
जाहला रे चंदनी हा पेटता अंगार आता

यौवनाची मालकंसी रंगलेली रात सारी
मुग्ध स्पर्शी चांदणे ही हाय झाले पार आता

अनुजा (स्वप्नजा)

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११

मज सख्याचे स्वप्नं जडे

मज सख्याचे स्वप्नं जडे
पाऊल नकळत अडखळे.
स्वप्नं असे का सत्य असे
जाणीव त्याची नसे..

स्वप्नी त्याची चाहूल होता
उरी सागरी उठती लाटा
नयन उघडण्या राजी नसे.....
मज सख्याचे स्वप्नं जडे

स्वप्नी येता हात पकडता
गालावर उमटे रक्त रंजिता
ओठांवर आणि फुलती फुले
मज सख्याचे स्वप्नं जडे

सुखचित्र मी मनी रंगवता
आणि खरोखर स्वारी येता
दर्पण दाखवी खेळ नवे
मज सख्याचे स्वप्नं जडे

शृंगाराला वेळ न उरता
हळूच मिठीचा विळखा पडता
धन्य तो शृंगार घडे
मज सख्याचे स्वप्नं जडे

नभः श्यामल मिठीत मिटून जाता
कृष्णमय राधा होता होता
सर्वांगाची मुरली बने
मज सख्याचे स्वप्नं जडे ...


अनुजा (स्वप्नजा) 

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

तु.............................

तु प्रेम तु भक्ती
तु जीवाची आर्त
आरती.....

तु शृंगार तु अंगार
तु चंडिकेची
सार्थ शक्ती.......

तु हास्य तु क्रौय
तु महानंदेची
विरक्ती........

तु राधा तु मीरा
तु कृष्णाची
भावमुक्ती......

तु तेज तु शीतल
तु चंद्राची
आसक्ती ..........

तु सर्व तु विश्व
तु सृजनाची
जन्मदात्री.............

अनुजा (स्वप्नजा)

चांदण्याचे स्वप्न

तुझा दोष नाही सुर्यास घाई उजाड्ण्याची
सोडवेना परी सख्या तुझी मिठी ही मधाची

तुझा दोष नाही दवास सांडायचे होते पहाटे
ओठांत तुझ्या पण अजुनी कोवळे पाते नहाते

तुझा दोष नाही प्राजक्त तिष्ठला असे अंगणात
परी जुईचा सुवास तुझा भिनला कसा श्वासात

तुझा दोष नाही भैरवी गात चांदणे उभे नभात
मल्हार वेडे स्पर्श तुझे हे उमलतात स्पंदनात

तुझा दोष नाही कवेत घेण्या आतुरला पहाटगारवा
उष्णतुझ्या बाहुतला पण अजूनी हाकरतो मारवा

तुझा दोष नाही सख्या रे मावळली ती चांदरात
चांदण्याचे स्वप्न माझे वळूनी थांबले उंबर्यात

अनुजा(स्वप्नजा)

मी रुसते तेव्हा

रणजीतच्या ती रुसते तेव्हा ..या कविते वरून प्रेरणा घेऊन 




मी रुसते तेव्हा त्याच्या नेत्री कल्लोळ दाटुनी येतो
प्राण अडकुनी श्वाससतारी तो दिडदा दिडदा होतो


मी रुसते तेव्हा ओंजळीत तो हिरवा मरवा देतो
रुसून बसल्या पापणीत मग स्वप्न चांदवा फुलतो

मी रुसते तेव्हा डोळ्यामधुनी हे सरसर शिरवे येई
ते मोती अलगद वेचे तो अन मग हळवाहळवा होई

मी रुसते तेव्हा सांगे नाते मल्हार जोगीयाशी
तो शोधत बसतो सूर पोरके माझिया हुंद्क्यापाशी

मी रुसते तेव्हा कविता त्याची उदास शिरवळ होते
शब्दासाठी नकळत मग ती मिठीत माझ्या येते

मी रुसते तेव्हा भालावरची अल्लड बट सारुनी
असा घेतसे काळीजठाव तो थेट नजर गुंतवूनी

मी रुसते तेव्हा अन हरती जेव्हा त्याचे सर्व उपाय
तो काढतो मग अस्त्र मोहिनी तो होतो चांदणसाय

मी रुसते तेव्हा रात्र पौर्णिमा पहाट कविता होते
मूडपुन गेली ओठकळी मग अधरी त्याच्या फुलते


अनुजा (स्वप्नजा)

गुरुवार, २६ मे, २०११

माणूसपण

बरंच झाल मी कधी
व्यासांना भेटले नाही...
शेक्सपीयर, शेले, किट्स.,
यांनाही नाही...

शेक्सपीयरला आनंदी
पाहवलं नसतं...
हसून त्याने केलेलं
प्रियाआरधन मनाला
काही भावलं नसतं...
त्याने आनंदी राहवंच कसं ?
गणित कधीच जमलं नसतं
बरं झालं...

कालिदासाला नाही भेटले
नशिबच...
नाहीतर ऋतुसंहार प्रमाणे
त्याच्या आयुष्यातले बदलते
ऋतु मला पेलले नसते...
मेघदूतातल्या एका वेड्या
मेघाने असेच कोसळणे.,
आत खोलवर सलले असते
बरं झालं...

कुसुमाग्रजांच्या कवितेलाच
मी माझी सखी मानलं...
त्यांच्या ताठ कण्याला
मनात का होइना
सरळ नी ताठच ठेवलं...
सरळ कण्याला टक्क्याटोणप्यात वाकलेलं
मानवलं नसतं...
वेडात दौडलेल्या त्यांच्या
सात वेडयांचं वेडेपण
आयुष्यात शहाणं झालेलं
पाहवलं नसतं...
बरं झालं...

भटांची गझल
खोलवर रुजली, फुलली,
आणि मनापासुन तीने
साथ ही दिधली...
पण कदाचीत, "आयुष्य" फुलवत नेण्यार्‍या
या गझलेला, आयुष्य "ढकलत" जगताना
पाहवलं नसतं...
रोजच्या फुलत्या वसंतात
शिशिराचं येणं साहवलं नसतं
बर झालं त्यांनाही नाही भेटले...


आकाशीचा चंद्रमा
पृथ्वीवरुनच पहावा...
जवळ गेले कि त्यातले
खड्डे प्रकर्षाने दिसतात...
शीतल चंद्रावर काळे दाग
खुप खुप खुपतात...
नक्षत्रांना आकाशीच्या
आकाशयात्रीच राहू द्यावं...
काटेकोर काटेरी माणुसपण
त्यांना अस्पर्श रहावं...

अनुजा (स्वप्नजा)

संस्कार :2

पायच काय मनही ठेचाकाळंलय रक्ताळंलय ...
"अनामिक" पणे तुझ्या स्वप्नाचा विचार करता करता
स्वतःला कधी या मतलबी जगात विकल नाहीरे कळल .......

आज हॉटेल च्या पायर्या चढले ते डील पक्क करायचाच म्हणून
नोक केल आणि समोर तु ..
काय काय आतिषबाजी झाली मनात रंगांची स्वप्नाची ...
सगळ्या सगळ्या ची...
पण हे सगळ तु मिठीत घेइपर्यन्तच ..
नंतर वास्तवच जहरी भान आलं ...
आतिषबाजी नंतरच्या राखेसारख .....

नकार दिला आणी पुन्हा एकदा ...
अक्षरशः आत्महत्या केली मी....

आधी क्षणा क्षणा ला मारताना नरक भोगताना
डोळ्या समोर तु होतास
पण आता तेही समाधान संपलाय ....

त्या "अनामिकाचा" शोध थांबव आता
कारण त्याच विहित आणि अधिलिखित कार्य
तुज्या मिठीत आल्याआल्या संपलय .....

आता मस्त कॉकटेल जमलय
संध्याकाळ हळूहळू रात्रीत वीर्घलातेय
आणि वर पाऊसही रिमझिंमतोय
हातात rum आणि मनात तुझी आठवण
आता मस्त कॉकटेल जमलाय ......

तसं लिहून ठेवलाच आहे पण...
चितेला अग्नी तूच द्यायला हवायेस ....
कोणत्या नात्याने? खरच रे...
तुझी न होता दारोदार भटकलिये
देहाची लक्तरे घेऊन ....
पण त्या अनामिकाची परत फेड म्हणून तरी ....
अग्नी दे....

आता मस्त कॉकटेल होणारेय
माझ्या वेदनेच आणि मृत्यूच
शेवटच आणि सगळ्यातून सोडवणार ......

तुझ्या हातून एकतरी संस्कार या देहावर घडू दे .....
उद्या तूच अग्नी दे .............

अनुजा (स्वप्नजा)

संस्कार:1

आता मस्त कॉकटेल जमलय
संध्याकाळ हळूहळू रात्रीत विर्घलातीये
आणि वर पाऊसही रिमझिंमतोय
हातात rum आणि मनात तुझी आठवण
आता मस्त कॉकटेल जमलय ......

सोडून गेलास तेव्हा अशीच
संध्याकाळे सारखी विरघळून विरघळून
गेले होते ...
वाटले होते संपल आता आणि फक्त आता आठवणीचा पाऊस....
कोसळला खरा तो पण कशी कोण जाणे...
जगले मी हट्टाने ....

आणि आज अचानक समोर आलास ...
घट्ट अंधाराचा पडदा सारून
लखलखित प्रकाशासारखा ...
बघितलसपुन्हा पहिल्यासारख ..
एका नजरेत पिऊन टाकणार ...
मनात प्रचंड काहूर माजल खर
पण ...पण .. त्याआधीच पकडलास हात
आणि...
विचारलास त्याच आर्ततेने ..
डोळ्यात थेट डोळे घालून
शब्द थेट मनात उतरवून....
होणारेस ना माझी? फक्त माझी?
मी बोललेच नाही तेव्हासाराखीच ......
आणि घनगर्द मेघ प्राजक्ताला बिलगावा
तसं घट्ट मिठीत मिटून घेतलास
इतक्या दिवसांनी.....
इतक्या दिवसांनी जिवंत आहे असं उगाच भास झाला....

चिंब सडा प्राजक्ताचा बरसला खरा ....
म्हणालास ये आता फक्त तुझी कमी आहे
सगळ मिळवलाय मी फक्त पायी तुझ्या
टाकण्याची देर आहे ....
मी हसले तुला आवडते तशीच ..

तु गेला होतास ते कर्तुत्व फुलवायला ....
आणि सहज "विसरून जा" सांगून कट्यार चालवल्यावर ...
आता पुन्हा ये म्हणतोयेस ..
परतण्याच्या सगळ्या वाटा बंद झाल्यावर ...

काय रे म्हणालास कुणा अनामिकाने केली
होती पैशाची सोय...
किती भरभरून बोलत होतास त्याच्याबद्दल ...
पण विचारलास? कसे ग दिवस काढलेत माझ्या विना? ....
एका अवाक्षर...?

एका दोरीच्या दोन टोकांना
आपण दोघे बांधलो होतो...
जीतका वर तु जात होतास
तितकीच मी घसरत होते..........
आता तर नजर उचलून
तुझ्याकडे बघानाही शक्य नाहीये ...
आणि तु परतलायेस अश्या वळणावर.....

पण ... लगेच सावरलाय मी स्वतःला ...
आणि तत्क्षणी नकार दिलाय तुला....
तुझ्या फुटलेल्या स्वप्नांच्या
काचेवरून चालत जाऊन लिफ्ट चा
दरवाजा गाठला.........


क्रमशः 

चांदणकोर


नजर तुझी मधाची कट्यार 
स्पर्श तुझा चांदण अलवार 
श्वास तुझा अग्नी उबदार 
ओठ तुझे नशेचे कोठार


अशी चाले नयनाची जादुगरी 
हळूच तु मला बाहूत बद्ध करी 
श्वास विसावतो तुझा हळूच गाली 
ओठ उठवती मग लाख चंद्र भाळी 



मिठीत तुझ्या हरवते भान 
जवळ घेता उठे कल्लोळाचे रान
ओठ घेशी ओठी जणू अमृतपान
स्पर्श स्पर्श होतो तुझा रेशीम खाण



गात्रतुनी फुले मालकंस ओला 
श्वासातुने खुले वासंतिक झुला 
नाजूक नखाचा अंगावरी फुलोरा 
कधी नाजूक तर कधी होतो विखारा



पहाट दवात घेशी तु कवेत 
काटा सुखद बोचे तनामनात 
मिटून जाते मी आवेगी मिठीत 
नाहते मग मधुर चुंबन धारेत 



असे हे मिलन सुखद मधुर 
सोडताना मिठी दाटे हुरहूर 
पुन्हा घेशी ओढून जाताच मी दूर
विसावते पुन्हा कुशीत चांदणकोर 



अनुजा (स्वप्नजा)

सोमवार, ९ मे, २०११

सावित्रीच्या लेकी :-स्त्रीवाद नाही साम्यवाद



"आज पासून संध्याकाळच्या पोळ्या तु कर " आईसाहेबांच फर्मान सुटल आणि अचानक का का का ????? काहूर उठल, अर्थात पोळ्या करण ही फार मोठी बाब नव्हतीच  मुळी ... पण ज्या कारणासाठी मला हे काम गळ्यात घ्यायला सांगण्यात येत होत ते कारण जवळपास संतापजनक होत...  कारण ओळखल असेलच "जावई शोध " सुरु झाला होता...
अभियांत्रिका चा अभ्यास करताना जी आई कपबशी ला देखील हात लाऊ देत नव्हती  तिने अचानक मला कामाला लावलं होत ... तुला हे आलं पाहिजे , तु हे केल पाहिजे, आता ह्याची सवय करून घे आता त्याची सवय करून घे का? तर मला लग्न करायचं होत...
मला एक प्रश्न पडतो ज्या आया शिक्षणाच्या बाबतीत आमच्या नोकर्यांच्या बाबतीत पुरोगामी असतात त्या लग्न ही गोष्ट निघताच १८५७ काळात का जातात? तु कुठेही कमी नाहीस अस लहानपणापासून मनावर ठसवनार्या आया या बाबतीत तु ईथे कमी आहेस आणि तु सुधारायच असा कस म्हणतात?
वयाच्या २३ व्या वर्षी तडजोडीची दीक्षा देण्यात येते ती कशी साध्य होणार? उपवर मुलीनी करण्या सारख्या बर्याच गोष्टी तिचे पालक तिला कानी कपाळी ओरडून सांगत असतात ..हा त्यांचा दोष आहे की आधुनिकता आणि पारंपारिक पणा या दोन्ही दरडींवर पाय ठेवणाऱ्या आपल्या समाजाचा आहे ? उपवर मुलांना तुला लग्नानंतर या गोष्टी करायच्या आहेत हे किती मुलांचे पालक सांगतात? उलट मुलांच्या आई अगदी नाक वर करून म्हणतात आता बायको आली की घे तिच्या कडूनच सगळी काम करून... तेव्हा किती पालक विचार करतात की येणारी मुलगी ही आपल्या मुलाच्याच वयाची आहे आणि त्याच्या इतकीच शिकलेली आणि त्याच्या सारखीच कामाणारी आहे ... तिच्या कडून काम करून घे ,सांगण्या पेक्षा आता तुला तिलाही सहकार्य कराव लागेल हे का नाही शिकवत?
कोणती आई मुलाला किमान चहा करायला शिकवते? बर्याच ठिकाणी चित्र काहीश्या प्रमाणात बदलल असल तरी अजूनही अगदी आधुनिक आणि सुशिक्षित कुटुंबातून मुलीना तु मुलगी आहेस म्हणून हे करायचाच आहे हे ऐकवलं जात ... कितीही समानतेच्या गप्पा मारल्या तरी आयुष्याच्या या वळणावर मुलगी ही मुलगीच असते ...आता म्हणाल मुलगी आहे तर मुलगीच म्हणणार ठीक आहे हे ,... पण इथे म्हणण एवढ्च आहे की ज्या तडजोडी मुलीला कराव्याच लागतील हे सांगितले जाते तेव्हा मुलानाही आम्ही ज्या तडजोडी करतो त्याची जाणीव असायला हवी ....
कधी नवत स्वयंपाक करनार्या मुलांचं जे कौतुक होत आजहि ..तसच आमच्या नोकरिचहि होउ दे हि माफक अपेक्षा  नाहीये का?
सावित्रीच्या लेकी म्हणून आज अभिमानानी मिरवतो पण या महत्वाच्या निर्णयाच्या वेळी मात्र तड्जोडिला सिद्ध होतोच न???
स्त्री पुरुष  स्पर्धक नाहीत पुरक आहेत हा आपल्याच पुराणात सांगितलेला  विचार अमलात कधी  येणार?

दे मंत्र पुन्हा जो दिला समर्थे तुझला


  रायगडावर जाण्याचा योग नुकताच आला पहिल्यांदा तीन तास वाट आणि नुसतेच सह्याद्रीचे सुळके पाहण्यात वेळ गेला पण नंतर अक्षराशः सार्थक झाल्यासारख वाटल. आधी पुणेकर असल्याने साहजिकच सिंहगड हाच जीव कि प्राण होता त्याची भव्यता खूप!!! पण आता हा किल्ला पहिला  आणि राजधानीचा खरा अर्थ कळला. तो इतका भव्य दरवाजा कि तो पाहताच आतल्या वैभवाची साक्ष पटावी. तसं पाहिलं तर मला विशेष अप्रूप नव्हत  वाटायचं कि त्यात काय! महाराजांबद्दल खूप अभिमान होताच पण तरीही पाऊल तसं मागेच होत. वाटायचं कि जणू ते दिवस पुन्हा तर येणार नाहीत कशाला त्यात गुंता? पण  रायगड पहिला आणि खरोखर पुन्हा इतिहासाच्या प्रेमात पडावसं वाटल मनापासून! तिथल्या मातीतून हर हर महादेव ची गाज आजही येते असा भास खरोखर होत होता. पवलागाणीक वाटायचं इथे शिवरायांचा स्पर्श झाला असेल इथे ते बसले असतील इथून कितीतरी मोहिमा पार पडल्या असतील सगळ कस अगदी भाराल्यासारख  झालेलं!
     तिथली बाजारपेठ पाहून तर तुळशी बाग डोळ्यासमोर तरळली, तो भव्य नगारखान  जिथून विजयाच्या शेकडो नौबती झडल्या असतील आणि तो राजप्रसाद जिथे महाराज सिहासनावर बसाले असतील ….. आणखी काय काय वाटत होत,  मनाशी विचार केला आपण एवढे emotional कधी झालो बर? मग कळल वातावरणाचा परिणाम होतोच कितीही अलिप्त राहायचं ठरवलं तरी एक झुळूक अशी येते कि तिच्या सुगंधाने आपल मन आपल्याला त्यात गुंतायला भाग पाडतं वाहवत नेत स्वतःसोबत आणि मी अशीच त्या शिवशाहीत अक्षराशः न्हाहून गेले. मग एक नवीन खेळ सुरु झाला प्रत्येक ठिकाणी ती व्यक्ती तो प्रसंग खरा घडतोय असा वाटू लागल आपण त्यातला एक अव्यक्त भाग आहोत हि जाणीव होऊ लागली. मन अभिमान, आनंद अश्या संमिश्र भावनांनी भरून आलं. कवी भूषण  आपल काव्य गाताहेत असं वाटू लागल.
      समाधीस्थळ आलं  आणि महाराज गेल्यावर जो कल्लोळ त्या लोकांच्या मनात  उठला असेल ती भावना मानत खोलवर दाटून  आली आणि लगेच वर्तमानात माझी पावलं आपोआप आली प्रकर्षाने वाटल पुन्हा तेच घडायला हव आहे का? परत सावरकरांनी म्हणल्या प्रमाणे ” दे मंत्र पुन्हा जो दिला समर्थे तुजला” असा घडायला हवय मंत्रमुग्ध  व्हायची वेळ आली आहे……फक्त मराठीपणाचे पोवाडे गावून काय होणारेय?  एवढी मोठी  राजधानी बांधणारा हिरोजी इंदुलकर आज आहे? जो इनाम मागतो तर काय एक क्षुल्लक शिलालेख ज्या वरूनही त्याची निष्ठाच ओसंडून वाहते ” सेवेसी ठाई तत्पर हिरोजी इंदुलकर ” ! आज सगळीकडे मंत्रीपदसाठी सख्यांचा जीव घेणारेच सपडतात.. महाराज त्यांच्या कार्याने आपल्यासाठी वाट आखून गेलेयेत पण त्यावर साध चालण्याच धैर्य किती जणात आहे? फुगत चाललेले पगार आणि परदेशवार्या यातून मध्यम वर्गाला वेळ नाही, मोठ्यांची दुखणीही मोठी आणि गरिबांना रोजच्या संघर्षातून वेळ आहे? आपल्या महाराष्ट्राला वाली आहे? आपला महाराष्ट्र आणि पर्यायाने आपण खरोखर पोरके झालो आहोत? मागची अभिमानाची जाणीव कापरा सारखी उडून गेली, कसला अभिमान? माझ्या इतक्या २२ -२३  वर्षाच्या आयुष्यात मी काय केलं अस लोकविलक्षण? का मला त्यांच्या गड कोटांचा अभिमान वाटावा? माझ त्यात काय योगदान आहे?  मला फक्त जॉब्स अकॅडमिक इतक्यापुरातच रक्तच पाणी केलेलं आठवतं आता माझी खरच लायकी नाहीये त्यांच्या वैभवावर अभिमान धरण्याची……… मला अतिशय  एकट आणि अगतिक वाटू लागल तिथली चिमुटभर माती कपाळाला लावली आणि अस्ताला जाणार्या सूर्य सकट मी हि खूप एकाकी होऊन आणि असंख्य प्रश्न घेवून परतीच्या वाटेला  लागले.

रविवार, ८ मे, २०११

कविता किती अल्लड

कविता किती अल्लड होती वयासारखी !
घरासमोरच्या पिंपळपानातून सळसळत जायची,
एखाद्या दप्तरातून कधी हळूच डोकवायची,
चिमण्यांच्या चिवचीवाटात स्वप्नांचं घरट भारून टाकायची,
आणि जेव्हा ती घरी यायची,


हळूच माझ्या मनातून पेनात उतरून
वदवून घ्यायची काही हवं हळवं माझ्या कडून...
झर झर उतरून जायची, अलगद चाललेल्या पालखीसारखी...
कविता किती अल्लड होती वयासारखी !
आता काळाचा हात फिरलाय सगळ्यावर !
कोवळं अस्तर गळून गेलंय...
सुरुकुत्यांचं मळभ चेहऱ्यावर.., मनावर..!
छोट्या पायवाटेतून मोठेमोठे रस्ते.,
छोटे आनंद पायाखाली घेऊन
भले थोरले बाजारही सजले...

जसं निरागसतेत आणि माझ्यात अंतर पडत गेलं
तशी कविता ही रुसली...
तिच्या माझ्यातही नातं
लांब लांब होत होत
विरत गेलं...
सगळंच भरकटलं या दरम्यान !
शांततेला भगदाड पाडत बॉम्ब फुटत गेले.,
आईच्या कुशीची उब असूनही
लहानगे कोमेजले.,
कवितेच्या जागी रोज एक नवी घोषणा जन्म घेतेय.,
सृजनाच्या पोटी रोज एक नवी जात हुंकारतेय...

तुकड्यात वाटल्या गेल्या मनागत
कविताही भिरभिरतेय वार्‍यावर,
एका देशातून दुसरी कडे,
एका शहरातून दुसर्‍याकडे !
पण कधी कधी येते ती आडोश्याला माझ्या.
पण कोर्‍या आणि कोडग्या झालेल्या मनावर
तिचे थकले भागले हात आता उमटवत नाहीत अक्षर.

हिरमसून ती मग जाते दूर दूर
एका फुटपाथ वर संपलेल्या स्वप्नडोळ्यात,
आणि हलकेच त्या रखरख पापणीवर
गोठून जाते पहाटदवासारखी...
कविता किती अल्लड होती वया सारखी !


मूळ कविता- नज़्म बहोत आसान थी पहले
मूळ कवी- निदा फ़ाज़ली
स्वैर भावानुवाद- अनुजा


मूळ रचना :-

नज्म बहुत आसान थी पहले
घर के आगे
पीपल की शाखों से उछल के
आते-जाते बच्चों के बस्तों से निकल के
रंग बरंगी चिडयों के चेहकार में ढल के
नज्म मेरे घर जब आती थी
मेरे कलम से जल्दी-जल्दी खुद को पूरा लिख जाती थी,

अब सब मंजर बदल चुके हैं
छोटे-छोटे चौराहों से चौडे रस्ते निकल चुके हैं
बडे-बडे बाजार पुराने गली मुहल्ले निगल चुके हैं

नज्म से मुझ तक अब मीलों लंबी दूरी है
इन मीलों लंबी दूरी में कहीं अचानक बम फटते हैं
कोख में माओं के सोते बच्चे डरते हैं
मजहब और सियासत मिलकर नये-नये नारे रटते हैं

बहुत से शहरों-बहुत से मुल्कों से अब होकर
नज्म मेरे घर जब आती है.
इतनी ज्यादा थक जाती है
मेरी लिखने की टेबिल पर खाली कागज को खाली ही छोड के
रुख्सत हो जाती है और किसी फुटपाथ पे जाकर
शहर के सब से बूढे शहरी की पलकों पर
आँसू बन कर
सो जाती है।

..निदा फ़ाजली

शनिवार, ७ मे, २०११

मी झालेच नाही

मी अशी गझल जी मतल्यातच अडकून पडली
काफिये रदीफ दूर मूळ मात्रांतच होती चुकली

मी धृपद नव्हते कडाडणारे नव्हते ठुमरी वेडी
मी लकेर कोवळी नवथर होते हुकली मुकली

मी नव्हते मुरली किंवा राधा श्रीरंग ल्यायलेली
मी मीरा होते आभासात तयाच्या वेडी जी झाली

मी रडले तेव्हा आकाशी या घन कळवळले नाही
पण भल्या पहाटे प्राजक्तावर दवनक्षी होती सजली

मी झालेच नाही तुझी कविता लयीत फुलती खुलती
मी निम्मीशिम्मी अशी निर्मिती मनात राहून गेली

अनुजा

अनौरस

आसुसुन तीने बाळाला हातात घेतले
आणि गुंतत गेली ती त्या बाळवासात
तो कोवळा नाजुक नवथर वास ती
साठवत रहिली श्वासात पान्ह्यात काळजात

सगळ संपल असली तरी आईपण
अजुन एवढ ताज कस? तीला नेहमी वाटे
सृजनाचा तो सोहळा पहाताना नेहमीच
वेदना आणी सुखही तिच्याही गात्रातुन दाटॆ

फ़ुलांचा भार पेलण्याची ताकद असुनही
काही वेलींना पानांची वेदना जपावी लागते
मुळच काय आधाराचे वृक्ष ही उन्मळून पडले
तरी वांझपणाचीही धुरा सांभाळायची असते

सहज मन दुसरी कडे जाव म्हणून
खिडकी बाहेर जाते तीचि नजर
चिंध्यात गुंडाळलेल अस्ताव्यस्त
नजरेला पडत एक देहाच लक्तर

हो ती तीच वेडी असते नेहमी
घरसमोरच्या रस्त्यावर हिंडणारी
डोळ्यात आख्ख शुन्य होत तिच्या
पन लक्तरातून होती न लपणारी उभारी

आज नेहमीच्या हालचालीत त्या वेडिच्या
एक अस्वस्थ जडपणा भरुन राहिला होता
खिडकी जरी आड असली दोघींच्या तरी
तीला तो क्षणाक्षणाला जाणवत होता

न राहवून ती उतरलीच झपाझप जीने
वेडी डोळ्यात शुन्य घेवुन निर्मळ हसुन गेली
आणि तीच्या वाढलेल्या पोटाकडे बघुन
हसता हसता हीची पावल थिजुन गेली

अनुजा(स्वप्नजा)

एकटीच

एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी
तु आला अचानक बदलवून गेलास जन्मांतरी

का तु दाखवले मला काट्यातही फुलती फुले
वेदनाही माझी का अशी जी तुझ्यापाशीच खुले
ग्रीष्मवेदना वेचताना का दाविल्या श्रावण सरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

आसवे ही सुख आणती अन सुखानेही येते रडे
तुझ्या स्पर्शी कवितेलाही प्राजक्ती स्वप्न पडे
अश्रुनाही का तु दिले कोंदण सुखाचे भरजरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

झोपलेल्या स्वप्नंफुलांना जाग आणली नवी
वठून गेल्या फांदिलाही हुंकारली कोवळी पालवी
का राखेतुनी घडवली पुन्हा मूर्त ही कारीगरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

जायचेच होते तुला तर का आणले श्वास तु
भंगल्या तनुतही का छेडीले गांधार तु
स्वप्नंभंगातूनही माझ्या अजून हिंडोल हुंकारी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी

मृत्युच्या नेक खांद्यावरी फुलणार आता बागेसरी
एकटीच होते बरी मी एकटीच होते खरी





अनुजा(स्वप्नजा)

शुक्रवार, ६ मे, २०११

जीवनानंद मानला

आनंदाचा अर्थ माझा नेहमीच गहिरा राहिला
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला

मी गाळले अश्रू दुख्खावेगाने जरी किती
अश्रू संगेच माझ्या प्राजक्ता हा बहरला
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला


श्वासच झाला शत्रू इथे अन सुटला किनारा जरी
पण अश्रू माझे पिउनी सागरा खारा जाहला
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला

तरारून पाणी आले काटा बोचता जीवघेणा
त्याच वेळी फुलाने सुगंधाने मुग्ध नाहावले मला
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला

मृत्यू झाला आज माझा जिवाभावाचा सखा
परी माझा मृत्यूही मेघांनी केला साजरा
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला

झाले मी राख राख अस्तित्वही संपले जणू
पण दारातल्या जाईतुनी श्वास माझा हुंकारला
दुख्खाच्या दुव्यातुनीच आनंद नित्य ओसंडला

वाटेवरी जीवनाच्या दुख्खाच आसुसून भेटले मला
मी ही मग त्यालाच माझा जीवनानंद मानला


अनुजा(स्वप्नजा)

गुरुवार, ५ मे, २०११

चल आता मोडू चौकट

  मी नेहमीच अशी होते 
आणि तु नेहमीच तसा
माझ्या कवेत आभाळ सार
तुझा नकाराचा वसा

उल्का कोसळून व्हावी राख
समुद्राची किनार्यावर फुटावी लाट
झोकून द्याव मिठीत तुझ्या
होऊन पिसाट झंजावात

समिधे सारख जळून जाव
आगीत प्रेमाच्या झोकून द्याव
विझून गेली आग तरी
निखार्या सम धगधगाव

तुज्या कडे मी कधी मागितलं?
चांदण्यांनी भरलेलं आभाळ?
वसंतही फुलता नको होता
नको होता पाऊसकाळ

हव होत वेडेपण जलधारेसारख
उंचावरून कोसळणार
असंख्य अडथळे येऊनही
अखंडपणे वाहणार

मी अजूनही तशीच आहे
बेभान तुझ्याच साठी
तु बदललास पुरता
बदलूनही घेतलीस नाती

आता पुन्हा येतेय मी
जुनच वादळ नव्याने घेऊन
मुठीत माझ्या जुनीच स्वप्ने
आक्रोशात आजही आक्रंदून

आता तरी एकवार
घट्ट कर तुझी मिठी
जखम पुन्हा उघडी झाली
वाहून गेली माती

चल आता मोडू चौकट
लांदून जाऊ क्षितीज रेघ
बरसुया केवळ आपल्याच साठी
होईन वेडा सावळ मेघ ....


अनुजा (स्वप्नजा)