सोमवार, २६ सप्टेंबर, २०११

एक कळी


एक कळी फुल झाली आणि हसून झाडाला म्हणली 

बाबा निघाले मी , माझ्या घरी 

झाड गदगदले  आणि बोलले 
एवढे ऋतू कधी सरले .....
आत्ता परवा तर उन्ह ओटीवर यायचं 
तेव्हा पानांचं दुपट पांघरून 
लपेटून घ्यायचो 
फुल होतानाही तिला 
माझी कळीच ग  तु म्हणायचो 

वाटायचं सोसतील का हिला 
हिवाळे पावसाळे 
सुगंधाने भरून न  जाता पशु होणारे 
मेघ कभिन्न काळे माणूस थांबून राहतो निसर्ग नाही 
तळहातावर जपलेल्या कळीला 
उमलण्याची घाई 
जा बाई सुखी राहा 
माझ्या पानाचा आसरा 
मनी जपून राहा 

अनुजा रमेश मुळे 

रविवार, २५ सप्टेंबर, २०११

प्रिय बाबाला

माझे सगळे हट्ट खुप लाडाने पुरवण्यार्या माझ्या बाबाला,

आज कन्या दिवस , बाबा तू आठवणीनी मला विश केलस .....हसुन छान गिफ़्ट दिलस आणि तसाच उभा राहिलास भाबड्या डोळ्यांनी माझ्या स्वप्नाळू डोळ्याचा वेध घेत, विचारलं मी न "राहुन काय झालं???????"
खोल हसलास म्हणलास पिल्लु मोठं झालं, रीटर्न गिफ़्ट देण्याइतपत मोठं...मला गम्मत वाटली अजुनही शिश्पेन्सिल पासुन गाडी पर्यन्त माझे हट्ट आनंदाने पुरवणारा बाबा माझ्याकडे कहितरी मागतोय ......काय हवं तुला बोल....आज मी बाबा आणि तू माझ पिल्लु ....

पुन्हा हसला, उन्हाच्या तीरीपेसारखा....म्हणला अनु अग वस्तु नकोय ग काही. तुझा, तुझा वेळ देशिल थोडासा????? खळकन आत तुटलं काहितरी आणि डोळ्यानी फ़ितुरि केली दोघांच्याही .....

मला आठवला तो बाबा, मला गणपतीच्या दिवसात तासंतास गल्लीबोळातून गणपती दाखवत फ़िरवणारा.....त्या गर्दीत एखाद्याने गणपतीची मुर्ती जपावी तसा मला जपणारा.....दर शनिवारी मी शाळेत जायला हट्ट करणार आणि आइ चिडणार त्यावेळी मी शाळेत जाव म्हणुन मला दर शनिवारी नव पेन घेउन देणारा......शाळा सुटली आणी कोलेजच्या फ़ुलपंखी दिवासात मी आले ....तेव्हाही माझ्या प्रत्येक गोष्टीच कौतुक करणारा ....नवनवीन नखरे पाहुन डोळे वटारण्यार्या आई ला माझ्यासाठी प्रसन्गी लाच देणारा माझा बाबा....माझ नाटक पाहता याव म्हणून सुट्टी साठी बोस शी तंड्णारा बाबा...मला जरा जरी खरचटल तर "अला मन्तर कोला मन्तर ची जादु करणारा बाबा अश्या एक न अनेक आठवणी.....
कधीही कुठल्या गोष्टीत मला नेहमी पुढे जा सांगणारा बाबा.....ओरडण त्याला माहित नव्हत असा माझा बेस्ट फ़्रेन्ड....

पण अताशा बदलल होत सगळ गणपती पाहण्यातली मजा कधीच ओसरुन गेली होती, पेन वगरेशी तर संबध तुटला होता .....ख्ररचट्ण च काय मोठ्या जखमा ही होत होत्या आणि या नेहमीच्या रहाटगाडग्याने मला पुरतं वेढल होत ......मला नोकरीत रजा न मिळाल्याने अनेक क्षण माझ्याशिवाय गेले होते त्यांचे....माझ्या आयुश्यातल्या लहानातल्या लहान प्रसंगात माझ्या कौतुकाला किन्वा अपयश आल तर मला सावरयला माझे आइ बाबा होते .....पण त्यांचे बरचेसे प्रसंग आनंदाचे क्षण माझ्या हातातून निसटून गेले होते.....

अचानक आतुन मला आणि बाबाला जाणवल कधी हे सगळे दिवस सरले???? रेतीसारखे क्षण ख्ररच निसटून जातात ....
पण मी ठरवल आहे जितक्या समरसून त्यानी माझ्या आयुश्यात रस घेतला मी ही घेणारेय ....

या वेळी बाबा ला रीटर्न गीफ़्ट नक्की देणारेय............

अनुजा रमेश मुळे

शनिवार, २४ सप्टेंबर, २०११

लेक लाडकी

२५ सप्टेंबर रविवार ..............

हा रविवार सगळ्यांसाठी असणारेय खास ......
ज्यांच्या लेकी लहान आहेत त्यांचा वर्तमान सांगणार्या 
ज्यांच्या मोठ्या झाल्या  आहेत, आपल्या घरी गेल्या आहेत, त्यांच्या गोजिरवाण्या आठवणी जगवणाऱ्या ......
आणि होऊ घातलेल्या आई  बाबांना सुखद भविष्याची स्वप्ने दाखवणारा ....
हसता हसता तिच्या आठवणीनी डोळ्यात पाणी आणणारा 
एक खूप खास रविवार .......

आपल्या बाहुलीला सजवा शब्दालंकारांनी आणि सामील व्हा 
मराठी कविता समूहाच्या 
"लेक लाडकी " उपक्रमात ..................

२५ सप्टेंबर २०११ पासून सकाळी ........

शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०११

अंधार हा गहीरामाळून काजव्यांना आल्या निजून राती
अंधार हा गहीरा गेल्या करून राती

जेव्हा विझून जाती येथील शामदाने
तेथे उजाडते अन येती सजून राती

ते लाजणे जरासे स्वप्नांत गुंग होणे
कौमार्य कोवळॆ हे गेल्या लुटून राती

ती सांधते अजूनी लज्जा विखुरलेली
हे रोजचेच आहे गेल्या हसून राती

गर्भात रोवलेले ते भोग वासनांचे
पेलीत जीर्ण नाती गेल्या थकून राती

रेखाटली ललाटी रेषा म्हणॆ तयाने
देवास ही इथे त्या गेल्या विकून राती

शृंगार नित्य चाले बाजार भावनांचा
पाहून नग्नता ही जाती थिजून राती

येयील का कधी तो श्रीकृष्ण उद्धराया
पाहून वाट त्याची गेल्या सरून राती

अनुजा(स्वप्नजा)

गुरुवार, २२ सप्टेंबर, २०११

प्रार्थना

मराठी कविता समूहाचा चा सर्वांग सुंदर  उपक्रम लिहा प्रसंगावर गीत त्यासाठी लिहिलेली प्रार्थना 


प्रसंग :- "आसावरी प्रधान" व्यवसायाने सी. ए. 
संगीतावर निस्सीम प्रेम आणि शास्त्रीय संगीत शिकायची पोटतिडीक लहानपणापासूनच असते. आपला अभ्यास व नंतरचं व्यावसायिक शिक्षण सांभाळून अनेक वर्षं ती पं. शुभदा पराडकर ह्यांच्याकडे शिकतेय. त्यांची पट्टशिष्या बनली आहे. ताईंना (शुभदा पराडकर) त्यान्ह्या कार्यक्रमात नेहमीच तानपु-यावर साथ करते.. आणि तिचे स्वत:चेही एक गायिका म्हणून आता बरेच नावही झाले आहे. काही मोठ्या कंपन्यांची आर्थिक व गुंतवणूक सल्लागार असलेली आसावरी स्वत:ची सी.ए. फर्मसुद्धा ताकदीने चालवते. पण लहान वयातच महिन्याला लाखो रुपये कमावत असतानाही तिला मन:शांती नाही, आपल्या कामातून पूर्ण समाधान नाही. संगीतातच आपलं करीयर घडवायचं आहे आणि तसा प्रवास व तालीमही चालूच आहे. पण तरी काही तरी कमी पडतंय.
अश्यातच तिची भेट तिच्या लहानपणीच्या एका मित्राशी होते... "सागर".
सागर "मानसोपचारतज्ञ" आहे. तो मतिमंद मुलांसाठी एक विशेष केंद्र चालवतोय. ज्याचं नाव आहे "क्षितीज". सागरसोबत आसावरी सहज म्हणून "क्षितीज"मध्ये जाते. ती निरागस मुलं पाहून, त्यांच्या प्रगतीसाठी झटून मेहनत घेणारे शिक्षक पाहून, स्वत: मानसोपचारतज्ञ असूनही ह्या कार्यासाठी आपला वेळ आणि पैसा कुठल्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता खर्च करणा-या सागरला पाहून आसावरीला जाणवतं की ह्या, अश्याच कामात खरं समाधान आहे.
ती संध्याकाळी ताईंना ही गोष्ट सांगते आणि ताई तिला त्या मुलांसाठी संगीतोपचारतज्ञ म्हणून काम करायची कल्पना सुचवतात.

.
प्रसंग -
.
आसावरी खूष होते. तिला तिच्या आयुष्यात ती शोधत असलेलं "समाधान" बहुतेक मिळालं आहे, हा आनंद वाटतोय. ती "क्षितीज' मध्ये जाऊ लागते. त्या मुलांना एक प्रार्थना शिकवते.
ही प्रार्थना निर्माते-दिग्दर्शकांना लिहून हवी आहे.

निर्मियले तु जे जे काही सगळे आहे उद्दात सुंदर
अपूर्णातही फुंकलेस तू प्राणाचे हे बीज शुभंकर ||धृ||

हुंकारातून तुझिया फुलले बागबगीचे तरुलता या
जीवन त्यांचे अल्प दिसाचे हसती तरीही आनंदे या
त्या सुमनांचा परम वारसा आपण सारे येथ जपूया
गंध ना जरी रंग ना जरी बनून राहू ओला दहिवर ||१||

तूच कोरले आभाळाचे निळे शिल्प हे कातीव कोमल
तूच घडवले अवनीला या सहनशील अन मलयज शीतल
त्या दोघांचे नाते सांगत फुलतो इथला जीवन परिमल
त्या नात्याची जरा पुसटशी आहोत आम्ही हळवी थरथर ||२||


पंखां मधले बळ हे दुबळे तरी अंतरी असीम शक्ती
ऐकून आहोत मनी मानसी तुझाच चेतन वावर असती
अंधाराच्या या रस्त्यावर लावून जाऊ दीपज्योती
वाट आंधळी चालत असता हाथ तुझा दे आणिक सावर ||३||

विश्व तुझे हे रंगमंच अन रंगवीशी तू असंख्य रचना
काही असती सुंदर रेखीव, अपूर्णतेचा ध्यास काहीना
मायेने त्या निर्मळ कलिका घेशी तूची कुशीत त्याना
तूच येतशी आणि फुलविशी "क्षितीजी" ऐसे सुंदर मंदीर ||४||

अनुजा (स्वप्नजा )

सोमवार, १९ सप्टेंबर, २०११

तुझ्यावरी मी जे उधळले होते शब्द सोने
आज बाजारी मांडले मी तेच गोड गाणे

निलाम होत जातील जेव्हा शब्दश्वास माझे
स्मरतील तू फुंकलेस त्यात जीवभास सारे
थरकतील तेच तोलता चांदीच्या हाताने
शब्दात तुझे साठलेत रेशीम धुन्दवारे

धमन्यातून तुझिया गीत रक्त म्हणूनी फिरले
आज ते प्राणगाणे मी वस्तू करून विकले
चेहर्यात तव चंद्राच्या मी भाकरी शोधिली
मग शब्दस्मशानी त्या बांधुनिया घरटे इवले

ह्या वर्तुळात कष्टाच्या त्रिज्येस हरवून बसलो
परिघातून निसटली कविता एकटाच उरलो
ऊब तुझ्या निखार्याची परक्यास धुगी देयील
राखेसही त्याच्या आता मी मोताद बनलो

तुझ्यावरी मी जे उधळले होते शब्द सोने
आज बाजारी मांडले मी तेच गोड गाणे

मूळ रचना : फ़नकार
रचनाकार : साहिर लुधियानवी

स्वैर भावानुवाद :अनुजा (स्वप्नजा)फ़नकार

मैंने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे
आज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ...

आज दुकान पे नीलाम उठेगा उनका,
तूने जिन गीतों पर रख्खी थी मोहब्बत की असास...
आज चांदी की तराज़ू में तुलेगी हर चीज़,
मेरे अफ़कार, मेरी शायरी, मेरा एहसास...

जो तेरी ज़ात से मनसूब थे, उन गीतों को
मुफ़्लिसी, जिन्स बनाने पर उतर आई है...
भूक, तेरे रूख-ए-रंगीं के फ़सानों के इवज़
चंद आशीया-ए-ज़रूरत की तमन्नाई है...

देख इस अरसागह-ए-मेहनत-ओ-सरमाया में
मेरे नग़्में भी मेरे साथ नहीं रह सकते...
तेरे जल्वे किसी ज़रदार की मीरास सही,
तेरे खाके भी मेरे पास नहीं रह सकते...

आज उन गीतों को बाज़ार में ले आया हूँ
मैंने जो गीत तेरे प्यार की खातीर लिखे...

- साहिर लुधियान्वी
रविवार, १८ सप्टेंबर, २०११

मौन नशा

उत्कटतेच्या असीम सीमेवरी मज थांबवू नको असा
पहा विसरली हा आवर्ण्याला रातराणीही सुगंध पसा

रक्तलालिमा पूर्व दिशेचा उजळूनही कसा फिक्कटसा
अडकुन पडला जराजरासा तुझ्या मिठीने चंद्र जसा

कुंतलकाळ्या रजनीडोही विरघळला हा पहाट्वारा
अनवट वळणावरी दवाचा मोहून ओला थिजे पसारा

सतार तारा पापणीत या फिरतो अचपळ फुंकर पारा
नको थांबवू छेडीत जा तू स्पर्श सरीच्या मधुर धारा

उषेस सार्या मिठीत घेते काजळ रेषा फिसकटलेली
नकोच घाई सावरण्याची हळू निनादे स्वप्न पाकळी

अजून ही ओलस लालस आहे ओठांची ही अमृतलेणी
थांब रे अजूनही साद घालते हृदयांची स्पंदन गाणी

सैल न झाली मुग्धगंध प्राजक्त कळी बघ फांदीवरची
कशी निसटली मग ओठातली केशरकाडी अधरांची

लीपिभाषेची तोडून सीमा आज उमगली नवीन भाषा
कळले वारुणीहुनी गहरी असते डोळ्यांची मौन नशा


अनुजा (स्वप्नजा)

शनिवार, १७ सप्टेंबर, २०११

राजसाझोप माझ्या राजसा रे रात्र झाली फार आता
सैल झाली ही मिठी अन संपला मल्हार आता

मोगर्याच्या पाकळीला पेंग आली मारव्याची
सांड्ला प्राजक्त सांगे तृप्त रे गंधार आता

रक्तिमा प्राशून माझ्या गीत ओठी गुंफ़ले तू
मौन गाणे हे तुझे रे होतसे साकार आता

तापलेली तार झंकारून आली या तनूची
तू कसा छेडीत जासी भैरवी श्रुंगार आता


शांभवीपेक्षा नशीली चाखली आता नशा मी
जाहला रे चंदनी हा पेटता अंगार आता

यौवनाची मालकंसी रंगलेली रात सारी
मुग्ध स्पर्शी चांदणे ही हाय झाले पार आता

अनुजा (स्वप्नजा)

गुरुवार, १५ सप्टेंबर, २०११

मज सख्याचे स्वप्नं जडे

मज सख्याचे स्वप्नं जडे
पाऊल नकळत अडखळे.
स्वप्नं असे का सत्य असे
जाणीव त्याची नसे..

स्वप्नी त्याची चाहूल होता
उरी सागरी उठती लाटा
नयन उघडण्या राजी नसे.....
मज सख्याचे स्वप्नं जडे

स्वप्नी येता हात पकडता
गालावर उमटे रक्त रंजिता
ओठांवर आणि फुलती फुले
मज सख्याचे स्वप्नं जडे

सुखचित्र मी मनी रंगवता
आणि खरोखर स्वारी येता
दर्पण दाखवी खेळ नवे
मज सख्याचे स्वप्नं जडे

शृंगाराला वेळ न उरता
हळूच मिठीचा विळखा पडता
धन्य तो शृंगार घडे
मज सख्याचे स्वप्नं जडे

नभः श्यामल मिठीत मिटून जाता
कृष्णमय राधा होता होता
सर्वांगाची मुरली बने
मज सख्याचे स्वप्नं जडे ...


अनुजा (स्वप्नजा) 

बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

तु.............................

तु प्रेम तु भक्ती
तु जीवाची आर्त
आरती.....

तु शृंगार तु अंगार
तु चंडिकेची
सार्थ शक्ती.......

तु हास्य तु क्रौय
तु महानंदेची
विरक्ती........

तु राधा तु मीरा
तु कृष्णाची
भावमुक्ती......

तु तेज तु शीतल
तु चंद्राची
आसक्ती ..........

तु सर्व तु विश्व
तु सृजनाची
जन्मदात्री.............

अनुजा (स्वप्नजा)

चांदण्याचे स्वप्न

तुझा दोष नाही सुर्यास घाई उजाड्ण्याची
सोडवेना परी सख्या तुझी मिठी ही मधाची

तुझा दोष नाही दवास सांडायचे होते पहाटे
ओठांत तुझ्या पण अजुनी कोवळे पाते नहाते

तुझा दोष नाही प्राजक्त तिष्ठला असे अंगणात
परी जुईचा सुवास तुझा भिनला कसा श्वासात

तुझा दोष नाही भैरवी गात चांदणे उभे नभात
मल्हार वेडे स्पर्श तुझे हे उमलतात स्पंदनात

तुझा दोष नाही कवेत घेण्या आतुरला पहाटगारवा
उष्णतुझ्या बाहुतला पण अजूनी हाकरतो मारवा

तुझा दोष नाही सख्या रे मावळली ती चांदरात
चांदण्याचे स्वप्न माझे वळूनी थांबले उंबर्यात

अनुजा(स्वप्नजा)

मी रुसते तेव्हा

रणजीतच्या ती रुसते तेव्हा ..या कविते वरून प्रेरणा घेऊन 
मी रुसते तेव्हा त्याच्या नेत्री कल्लोळ दाटुनी येतो
प्राण अडकुनी श्वाससतारी तो दिडदा दिडदा होतो


मी रुसते तेव्हा ओंजळीत तो हिरवा मरवा देतो
रुसून बसल्या पापणीत मग स्वप्न चांदवा फुलतो

मी रुसते तेव्हा डोळ्यामधुनी हे सरसर शिरवे येई
ते मोती अलगद वेचे तो अन मग हळवाहळवा होई

मी रुसते तेव्हा सांगे नाते मल्हार जोगीयाशी
तो शोधत बसतो सूर पोरके माझिया हुंद्क्यापाशी

मी रुसते तेव्हा कविता त्याची उदास शिरवळ होते
शब्दासाठी नकळत मग ती मिठीत माझ्या येते

मी रुसते तेव्हा भालावरची अल्लड बट सारुनी
असा घेतसे काळीजठाव तो थेट नजर गुंतवूनी

मी रुसते तेव्हा अन हरती जेव्हा त्याचे सर्व उपाय
तो काढतो मग अस्त्र मोहिनी तो होतो चांदणसाय

मी रुसते तेव्हा रात्र पौर्णिमा पहाट कविता होते
मूडपुन गेली ओठकळी मग अधरी त्याच्या फुलते


अनुजा (स्वप्नजा)