झोप माझ्या राजसा रे रात्र झाली फार आता
सैल झाली ही मिठी अन संपला मल्हार आता
मोगर्याच्या पाकळीला पेंग आली मारव्याची
सांड्ला प्राजक्त सांगे तृप्त रे गंधार आता
रक्तिमा प्राशून माझ्या गीत ओठी गुंफ़ले तू
मौन गाणे हे तुझे रे होतसे साकार आता
तापलेली तार झंकारून आली या तनूची
तू कसा छेडीत जासी भैरवी श्रुंगार आता
शांभवीपेक्षा नशीली चाखली आता नशा मी
जाहला रे चंदनी हा पेटता अंगार आता
यौवनाची मालकंसी रंगलेली रात सारी
मुग्ध स्पर्शी चांदणे ही हाय झाले पार आता
अनुजा (स्वप्नजा)
सुंदर कविता अनुजा!
उत्तर द्याहटवा