शुक्रवार, २३ सप्टेंबर, २०११

अंधार हा गहीरा



माळून काजव्यांना आल्या निजून राती
अंधार हा गहीरा गेल्या करून राती

जेव्हा विझून जाती येथील शामदाने
तेथे उजाडते अन येती सजून राती

ते लाजणे जरासे स्वप्नांत गुंग होणे
कौमार्य कोवळॆ हे गेल्या लुटून राती

ती सांधते अजूनी लज्जा विखुरलेली
हे रोजचेच आहे गेल्या हसून राती

गर्भात रोवलेले ते भोग वासनांचे
पेलीत जीर्ण नाती गेल्या थकून राती

रेखाटली ललाटी रेषा म्हणॆ तयाने
देवास ही इथे त्या गेल्या विकून राती

शृंगार नित्य चाले बाजार भावनांचा
पाहून नग्नता ही जाती थिजून राती

येयील का कधी तो श्रीकृष्ण उद्धराया
पाहून वाट त्याची गेल्या सरून राती

अनुजा(स्वप्नजा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा