बुधवार, १४ सप्टेंबर, २०११

मी रुसते तेव्हा

रणजीतच्या ती रुसते तेव्हा ..या कविते वरून प्रेरणा घेऊन 




मी रुसते तेव्हा त्याच्या नेत्री कल्लोळ दाटुनी येतो
प्राण अडकुनी श्वाससतारी तो दिडदा दिडदा होतो


मी रुसते तेव्हा ओंजळीत तो हिरवा मरवा देतो
रुसून बसल्या पापणीत मग स्वप्न चांदवा फुलतो

मी रुसते तेव्हा डोळ्यामधुनी हे सरसर शिरवे येई
ते मोती अलगद वेचे तो अन मग हळवाहळवा होई

मी रुसते तेव्हा सांगे नाते मल्हार जोगीयाशी
तो शोधत बसतो सूर पोरके माझिया हुंद्क्यापाशी

मी रुसते तेव्हा कविता त्याची उदास शिरवळ होते
शब्दासाठी नकळत मग ती मिठीत माझ्या येते

मी रुसते तेव्हा भालावरची अल्लड बट सारुनी
असा घेतसे काळीजठाव तो थेट नजर गुंतवूनी

मी रुसते तेव्हा अन हरती जेव्हा त्याचे सर्व उपाय
तो काढतो मग अस्त्र मोहिनी तो होतो चांदणसाय

मी रुसते तेव्हा रात्र पौर्णिमा पहाट कविता होते
मूडपुन गेली ओठकळी मग अधरी त्याच्या फुलते


अनुजा (स्वप्नजा)

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा